‘मी कोण
आहे’ हा प्रश्न विद्वान तत्ववेत्त्या पासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांचंच कुतुहल
वाढविणारा असतो, उत्कंठा वाढविणारा असतो. आपल्याला आपण कोण आहोत, कसे आहोत आपल्या
स्वभावाची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सूकता असते, त्याबद्दल
आपल्याला ऐकायला फार आवडते. बरेच जण भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातात
त्यावेळी भविष्याची उत्सूकता तर असतेच पण त्याहीपेक्षा जास्त भावतं ते म्हणजे त्या
निमित्ताने तो आपला भूतकाळ सांगण्याचा जो सोपस्कार तो भविष्य सांगणारा करतो तो,
आपल्या स्वभावाचं तो जे वर्णन करतो ते आपल्याला जास्त आवडतं, किंबहुना जो ज्योतिषी
हे वर्णन अचुक व सविस्तर सांगतो त्यावर आपला जास्त विश्वास बसतो.
मागील
लेखात आपण बघितलं की माणसाच्या वागण्याच्या निरनिराळ्या छटा असतात. आपल्या परीने
आपण त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करतो, आपण त्याला स्वभाव म्हणतो, सवय म्हणतो
निरनिराळी नांवे देतो कारण आपल्याला त्याबद्दल कुतुहल असतं, त्याबद्दल जाणून घेणं
ही आपली नैसर्गिक गरज असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्य रक्षणासाठी असलेली ही
एक मूलभूत आवश्यकता असते इंग्रजीत ज्याला Basic Instinct म्हणतात ती असते. आपण
आजारी पडतो तेव्हा बरं होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी निसर्गाने आपल्याला
दिलेल्या असतातच. आपल्या भोवती सृष्टीचं नीट निरीक्षण केलं तर जनावरांच्या बाबतीत
ते हे उपाय करतांना आढळून येतं. पण आपण सो कॉल्ड बुध्दिमान प्राणि आपण मात्र
रोगनिवारणाच्या कृत्रिम साधनांनाच जास्त चांगलं मानतो. पण आपली निरोगी राहण्याची,
रोगमुक्त होण्याची Basic Instinct आपल्यात in built असतेच ती ओळखण्याची,
वापरण्याची मूलभूत गरज ही असतेच. दुपारी खुप जास्त जेवण झालं की संध्याकाळी हलकं
खावं किंवा काहीच खाऊ नये असं वाटतं, भूक नसेल तेव्हा चमचमीत खावंसं वाटतं, फार
अपचन झालं की उलटी करावीशी वाटते, उलटी झाली की बरं वाटतं इ. आपण हल्ली ह्या बरं
होण्यासाठी निसर्गानं सुचविलेल्या संवेदना दाबून टाकायला, supress करायला शिकलोय
उलटी करावीशी वाटत असेल तर आपण लागलीच उलटी थांबवण्याच्या गोळ्या घेतो. त्यामुळे
आपण बरं होण्या ऐवजी एकातून दुसरा आजार निर्माण करतो. पण तरीही आपली बरं होण्याची
नैसर्गिक उर्मीही असतेच, आणि ती ओळखण्याची गरज त्याहीपेक्षा तीव्र असते, ही अशी
उर्मी असते हे आपल्याला माहीत नसते पण आतून तर ती उफाळून येत असते आपल्याला न
समजल्याने आपण अस्वस्थ असतो का ते मात्र आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानं मात्र ही
गरज ओळखून हे समजण्याचा शास्त्रीय मार्ग सांगीतला आहे तो म्हणजे प्रकृती. आयुर्वेदाच्या
शास्त्रीय परिभाषेत ह्याला प्रकृती म्हणतात हे आपण बघितलं. आज आपण ह्या बाबत आणखी
थोडी माहीती घेणार आहोत.
काहीजणांना
हे पचविणे थोडे अवघड जात असेल की वागण्याच्या निरनिराळ्या छटा ह्यांचा आरोग्य
रक्षणासाठी कसा उपयोग होत असेल, उर्मी वगैरे सगळं काल्पनिक आहे असं त्यांना वाटत
असेल आजच्या व्हॉट्स अॅपच्या भाषेत सांगायचे झाले तर हे लोक म्हणत असतील काहीही
हं......श्री..
पण
लोकहो...हे खरं आहे आपल्या मनात डोकावण्यासाठी वेळ काढला, शरीराचे अंतरंग जाणून
घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही हे सहज जाणवेल. अनेकांना ही उर्मी स्वस्थ बसु
देत नाही आणि त्यातूनच अनेक नवनवीन संकल्पनांचा जन्म झाला जसा रक्तगट आणि
व्यक्तिमत्व इ. अॅलोपॅथी जसं निदानाच्या आणि उपचाराच्या विविध प्रकारांचा वापर
करते, रक्तगट आणि त्यावरुन व्यक्तिमत्त्व ओळखण्याचे प्रयत्न हे या अशा उर्मींमधूनच
आलेले आहेत. ए टाईप पर्सनॅलिटी, बी टाईप पर्सनॅलिची व त्यांचा रोगांशी असलेला
संबंध हा ही प्रकार यातूनच आलेला आहे, प्रकृतीचेही ढोबळमानाने त्या सारखेच हे आहे,
पण त्यापेक्षा कितीतरी शास्त्रशुध्द, नेमकेपणाने व सर्वंकष पध्दतीने प्रकृतीमध्ये
वर्णन आढळते. प्रकृती हे वैद्यांसाठी उपचाराचे आणि रुग्णांसाठी आरोग्य रक्षणाचे एक
अत्यंत उपयुक्त साधन आहे. सध्याच्या प्रचलित वैद्यक शास्त्रापेक्षा आयुर्वेदाची
निदान व उपचाराची पध्दत वेगळी असल्याने अशा काही वेगळ्याच गोष्टींचा वापर निदान व
उपचारासाठी केला जातो आहे असे वाटेल.
सामान्यतः
आपण प्रकृती हा शब्द तब्येतीच्या संबंधात वापरतो काय वसंतराव काय म्हणतेय प्रकृती
असं विचारुन आपण त्या व्यक्तिच्या आरोग्यबाबत विचारपुस करतो, हिंदी भाषेत प्रकृती
हा शब्द निसर्गाला उद्देशून वापरला जातो, आपण ही प्राकृतिक सौंदर्य असा शब्दप्रयोग
करतो. आयुर्वेदात मात्र ह्या सर्व अर्थांपेक्षा वेगळा अर्थ अभिप्रेत आहे, वरील
सर्व अर्थ त्यात अंतर्भूत आहेतच पण आयुर्वेदात वापरल्या जाणा-या प्रकृति ह्या
शब्दाला एक नेमकेपणा आहे, त्याची स्पष्ट व्याख्या केली गेली आहे. प्रकृती हा
आयुर्वेदाचा एक पारिभाषिक शब्द आहे. प्रकृती याचा अर्थ मूळ स्वरुप, स्वभाव,
प्रकृती जाणून घेणे म्हणजे आपल्या शरीराचा, मनाचा, बुध्दिचा, इन्द्रियांचा व
शरीरातील अवयवांचा मूळ स्वभाव धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करणे. शरीर, मन इ. भाव
सर्वांनाच आहेत पण त्यातील वेगळेपणा काय आहे, तो तसा का आहे आणि त्यामुळे त्या
व्यक्तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींवर काय परिणाम होणार आहे ते ओळखणे म्हणजे
प्रकृती जाणून घेणे. आजचंयुग हे कॉम्प्युटरचे युग आहे, आपण कॉम्प्युटर विकत
घेतांना जसं त्याचं configuration बघतो, मोबाईल विकत घेतांना जसं त्याचे
features बघतो तसं आपली प्रकृती जाणून
घेणं म्हणजे आपल्याला या जन्मी जे शरीर मिळाले आहे त्याचे configuration व
features जाणून घेणं आहे. आपण configuration हे features किंवा का बघतो? आपण
घेतलेल्या computer, mobile कसे काम करणार
आहेत किती fast काम करणार आहेत, किती डाटा
स्टोअर करु शकणार आहेत ते समजावे म्हणून. तसंच प्रकृती जाणून घेतल्यावर आपल्याला
शरीराबद्दल अशीच उपयुक्त माहीती मिळते.
वैद्य अभय कुलकर्णी
आयुर्वेद वाचस्पती (M.D Ayurveda)
आयुःश्री आयुर्वेदीय हॉस्पिटल व रिसर्च सेंटर
इंदिरानगर नाशिक
www.ayushree.com
abhaynk@yahoo.com
No comments:
Post a Comment