Thursday, June 16, 2016

प्रकृती संकल्पना - स्वतःला ओळखण्याचा प्रभावी उपाय



एका बागेत काही मैत्रीणी गप्पा मारत होत्या त्यांचा संवाद कानावर आला तो असा होता...एक जण वैतागून सांगत होती माझ्या नव-याच्या संतापाला काय करावं कळत नाही एवढ्या तेवढ्या गोष्टींवरुन त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडते, दुसरी म्हणाली माझ्या नव-याचं अगदी उलट आहे, राग नावाचा शब्दच त्याच्या शब्दकोषात नाही, काहीही झालं तरी राग म्हणून कधी येतच नाही त्याला! एखादा माणूस इतका थंड कसा असु शकतो? माझा नव-याचं मात्र काहीच सांगता येत नाही, तिसरीनेही आपल्या नव-याविषयी सांगायची संधी घेतली, आज एखाद्या गोष्टीवरुन स्वारी चिडली तर उद्या तीच गोष्ट मात्र त्याला अगदी किरकोळ वाटेल, त्याच्या स्वभावाचा काही थांगपत्ताच लागत नाही मला. व्यक्तिंच्या स्वभावातला वेगळेपणा आपण असाच अनेकदा अनुभवलेला असेल नाही का? का असतो असा वेगळेपणा? आपल्याला वाटतं की हा माणूसच तसा आहे, रागीट किंवा शांत, संतापी किंवा प्रेमळ आहे. इ.
असाच दुसरा एक प्रसंग, आमचा राजु जरा म्हणून एका जागेवर ठरत नाही, पाटील आजी आपल्या मैत्रीणीला सांगत होत्या, मारुन मुटकुन बसवलं तरी शरीराच्या काहीना काही हालचाली चालूच असतात, जरा स्थिरता कशी नाही याला काय माहीत, त्या मिश्रांचा नातू बघा कसा शांत बसलेला असतो, जराही आवाज न करता स्वतःशीच पुटपुटत खेळत बसलेला असतो काही त्रास नाही त्याचा. पाटील आजींचा नातू व मिश्रा आजींचा नातू ह्यांच्यातला वेगळेपणा हा स्वभावातला वेगळेपणा आहे की पाटील आजींच्या नातवाला काही प्रॉब्लेम आहे?
एखाद्या व्यक्तिला भूक सहन होत नाही, वेळेवर जेवायला मिळाले नाही की त्याची चिडचिड होते, तर एखादी व्यक्ति दिवसभर जेवली नाही तरी त्याला फारसं लक्षात ही येत नाही. कुणाला गोड आवडतं तर कुणाला चमचमीत, कुणाला तिखट खाल्लं की त्रास होतो तर कुणाला दही खाल्ले की सर्दी होते. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो तर एखाद्या कारकुनाचे टेबल अत्यंत स्वच्छ नीटनेटके व आवरलेले आढळते तर एखाद्या क्लार्कचे टेबल अत्यंत पसरलेले दिसते, एखादी गृहिणी घर अत्यंत लखलखीत ठेवते तर एखाद्या गृहिणीचे घर यथेच्छ पसरलेले असते. कुणाचा आवाज अगदी भसाडा व बसका असतो तर कुणाचा चिरका, किनरा, कुणी अत्यंत हळु आवाजात बोलते तर कुणी सतत लाऊडस्पिकरवर बोलत असल्यासारखे वाटते.
आपण ह्या व्यक्तिंच्या वैशिष्ट्यांना वेगवेगळी नांवे देतो, स्वभाव, जन्मतः असेलेली जडण घडण शिक्षण, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक जडण घडण इ. नांवे देतो. ह्याला पूरक व्यक्ति तितक्या प्रकृति अशी आपण माणसांच्या स्वभावावरुन आलेली एक म्हणही आपण ऐकली आहे. पण त्याच वेळी एक सारखा स्वभाव असणारी अनेक माणसं आपल्याला आपल्या अवती भवती असतात असं दिसतं, मग हे कसं? ह्या सारखेपणात काही सूत्र असतं का?
हा सारखेपणा आणि वेगळेपणा ह्याला एकत्र जोडणारी एक संकल्पना आयुर्वेदाने मांडलेली आहे ती म्हणजे प्रकृति! आपणाला ऐकुन आश्चर्य वाटेल की ह्या स्वभाव वैशिष्ट्यांची एवढी चर्चा करण्याचे मुख्य कारण असे की ह्याचा आपल्या आरोग्याशी खुप जवळचा संबंध आहे. ह्या वैशिष्ट्यांची शास्त्रशुध्द मांडणी करुन आपण आपल्या शरीराचा, मनाचा, बुध्दिचा स्वभावधर्म कोणता आहे ह्याचे निदान करु शकतो. हे निदान करणे म्हणजे आपली प्रकृति कोणती हे जाणून घेणे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्यासंबंधी काहीही निर्णय घ्यायचा असल्यास हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रकृति कोणती आहे हे जाणून घेणे हा आपल्या सुखाचे गमक आहे असं म्हणल्यास अतिशयोक्ति होणार नाही. कारण ह्यावरुन आपण काय खावे प्यावे, कधी, किती व कसे खावे प्यावे ते समजेल, आपल्या घरातील व भोवतालच्या, कामाच्या ठिकाणच्या माणसांशी कसे वागावे म्हणजे एकमेकात वाद, भांडण तंटे टाळता येतील हे सहजपणे समजते, कोणता व्यवसाय करणे आपल्यासाठी चांगले आहे, कोणत्या नोकरीत आपण चांगले काम करुन प्रगती करु शकु हे ठरवता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला भविष्यात कोणते आजार होऊ शकतात व आपण ते कसे टाळु शकतो ह्या संबंधी मार्गदर्शन मिळु शकते, मला सांगा एवढी माहीती जर कळणार असेल तर आहे की नाही ही आयुष्याच्या सुखाची गुरुकिल्ली? बरं हे सगळं जाणून घेणं खुप मनोरंजकही आहे बरं का..आणि अगदी सोप्पं ही. आयुर्वेदात अशा अनेक उपयोगी गोष्टी आहेत ज्यांच्या बद्दल नुसतं जाणून घेतलं तरी आरोग्याचा स्तर कमालीचा उंचावु शकेल त्यातला हा एक अग्रगण्य भाग म्हणावा लागेल. मी खात्रीने सांगु शकतो की प्रकृतिसंबंधीचे नुसते ज्ञान मिळवल्याने आपल्या कुटुंबाचा आजारांच्या उपचारांवरचा खर्च लक्षणीयपणे कमी होऊ शकतो....इतकं सामर्थ्य या संकल्पनेत आहे. आपण ह्या विषया या पुढील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

No comments:

Post a Comment